Blog Detail

Image

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे..!


21 Oct 2024,4:21 AM

 D. M. Parshuramkar

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो, परीक्षा असते मागे राहणाऱ्याची.. कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत.. जो मागे राहतो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं.! आता प्रश्न असा असतो की ही आसवं, हे रडणं थांबवायचं कुणी.? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ? निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची, मुलींची, सुनांची.. थोडक्यात काय तर दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे.! लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात, आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात स्वतः उपाशी राहून, काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात, परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.. ...म्हणून आता ही आपली जवाबदारी असते, त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची. .! असं झालं तरच ते जगू शकतील, नसता "तो माणूस म्हणजे वडील" किंवा "ती स्त्री म्हणजे आई" तुटून जाऊ शकते, कोलमडून पडू शकते.! आणि ही जवाबदारी फक्त मुलं, मुली आणि सुना यांचीच असते असे नाही, तर ती जवाबदारी प्रत्येक नातेवाईकाची, परिचिताची, मित्र मैत्रिणींची ....सर्वांची असते..! फक्त छत, जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील..! आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय..? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ....म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या.! केवळ माया, प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा, त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या.! उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने, मायेने आणि आपुलकीने वागा....!

    Post Views:  54