Blog Detail

Image

जो प्राप्त है, पर्याप्त है.!


24 Oct 2024,5:55 AM

 D. M. Parshuramkar

"कौन बनेगा करोडपती" हा बौद्धिक, मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो.. आपल्या बुद्धीत भर पडते. जेव्हा मी मनात ठरवलेलं उत्तर बरोबर येतं तेव्हा मला खूप आनंद होतो. . परवाच्या भागात "फास्टेस्ट फिंगर फर्स्ट" या हॉट सीटवर बसण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांमध्ये, अव्वल ठरलेले "नीरज सक्सेना" हाॅट सीटवर आले. एकदम शांत रीतीने बसले. डान्स करत, ओरडत, हात उंचावत, अमिताभला जोरात मिठी मारत यातलं त्यांनी काहीही केलं नाही. . ओळख सांगायची तर ते सायंटिस्ट आहेत. पीएचडी आहेत व कलकत्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. अतिशय प्रसन्न, साधं व्यक्तिमत्त्व. . डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलामांसोबत काम करायला मिळालं हे जीवनातील भाग्य ते समजतात. त्यांनी सांगितलं की प्रथम मी माझाच विचार करत होतो, परंतु कलामांच्या सान्निध्यात राहून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांचा व राष्ट्राचा विचार करू लागलो. नीरजजी खेळू लागले. सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सफाईदारपणे दिली. त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक पाहून थक्क व्हायला झालं. तीन लाख वीस हजार जिंकून, बोनस तेवढीच रक्कम मिळविली मग ब्रेक झाला. . ब्रेक नंतर अमिताभ बोलू लागले... चलिए डाॅक्टरसाब, अब आपके सामने आ रहा है ग्यारहवा प्रश्न.. इतक्यात नीरजजी म्हणाले... सर मैं क्विट करना चाहता हूँ ! अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले. इतकं चांगलं खेळणारे, तीन लाईफ लाईन जीवित असताना. करोड रुपये सहज जिंकतील असं असताना खेळ सोडत आहेत का? विचारलं... आज तक ऐसा कभी हुआ नहीं.. नीरजजी शांतपणे म्हणाले... माझ्या शिवाय आणखी खेळाडू वाट पहात आहेत व ते माझ्या पेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळाली पाहिजे तसं तर मला खूप पैसे मिळाले आहेत. मला वाटतं... जो प्राप्त है पर्याप्त है ! अमिताभ बच्चन अवाक् झाले. सर्वत्र शांतता पसरली.एक सेकंद स्तब्धता होती. नंतर सर्वांनी खूप वेळ उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. अमिताभ म्हणाले... खूप काही शिकायला मिळालं. नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती आज पहायला मिळाली. खरं तर एवढी संधी समोर असताना केवळ दुसऱ्यांना संधी मिळावी व जे मिळालं तेवढं खूप आहे असा विचार करणारी पहिलीच व्यक्ती माझ्या पाहण्यात आली. आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही. कमीच पडतो. या पैशामागे लागून घर, झोप, नाती, प्रेम, मैत्री या साऱ्या गोष्टींना माणूस मुकत आहे. अशा वेळी डॉ. नीरज सक्सेना सारखी देव माणसं येतात व बोध देऊन जातात. . कलियुगात अशा समाधानी, अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे.! त्यांनी खेळ सोडल्यानंतर एक मुलगी हाॅट सीट वर येऊन बोलू लागली... तीन मुली झाल्या म्हणून वडिलांनी आई सहित आम्हाला बाहेर काढलं. आम्ही एका आश्रमात राहतो... मी विचार केला की नीरजजींनी खेळ सोडला नसता तर शेवटचा दिवस असल्याने कुणालाही संधी मिळाली नसती. आज त्यांच्या त्यागाने एक गरीब मुलीला चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली. जगात इस्टेटीतला एक पैसा सोडायची तयारी नसते. त्यासाठी भांडणे होताना आपण पाहतो. परंतु हे उदाहरण अपवाद आहे. देव माणसात असतो, तो नीरजजीं सारख्या दुसऱ्याचा, देशाचा विचार करणाऱ्या माणसात. मी आयुष्यात कधीच या अनोख्या व्यक्तिमत्त्वाला विसरणार नाही. गरज भागली की माणसानं थांबावं व दुसऱ्यांना संधी द्यावी. सर्व सुखी होतील. हा धडा शिकायला मिळाला.. !

    Post Views:  65